श्रीरामपूर(प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांच्या तपासाला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांची मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी श्रीरामपूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुजित राऊत हे उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होऊन बराच कालावधी लोटला. अद्यापपर्यंत हिरण यांचा तपास लागला नसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिरण यांच्या तपास यंत्रणेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः लक्ष घातल्यास तपास जलदगतीने होईल अशी अपेक्षा केतन खोरे यांनी व्यक्त केली.
अधिवेशनाचा कालावधी असल्याने रात्री उशिराने झालेल्या या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेपत्ता व्यापारी गौतम हिरण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना तात्काळ संपर्क साधला. हिरण प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याची सूचना देत वेळोवेळी आपल्याला माहिती देण्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गौतम हिरण प्रकरणात लक्ष घातल्याने तपास यंत्रणेला गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.