अहमदनगर- जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री दिलीप मनसुखलाल गांधी(वय- ६९) यांचे आज पहाटे दिल्लीत उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात निधन झाले.मंगळवारी कोरोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळुन आले होते.,त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना,एक मुलगी,जावई नातवंडे असा परिवार आहे.माजी नगरसेवक सुरेंद्र आणि देवेंद्र यांचे ते वडील होत.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत कोणताही राजकीय वारसा नसताना मोठा संघर्ष करीत काँग्रेसचा एकेकाळचा गड आणि साखर सम्राटांचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. एका अतिशय साधारण कुटुंबातून नगरच्या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली.१९८५ ते ९९ या काळात ते नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष होते.याच दरम्यान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे नगर शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष झाले.
१९९९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले आणि लगेच स्व. पंतप्रधान अटलजींच्या नैतृत्वाखालील मंत्रिमंडळात केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री झाले. त्यानंतर पुढे २००९ आणि २०१४ मध्ये नगर दक्षिण मतदारसंघातुन लोकसभेवर भाजपच्या तिकिटावर निवडुन गेले.विविध संसदीय समित्यांचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.संसदेवरील अतिरेकी हल्ल्याचे ते प्रत्यक्षदर्शी होते. संसदेच्या खांबाआड लपल्याने ते बचावले होते.
राज्यातील नामांकित शेड्युलड नगर अर्बन बँकेचे ते प्रदीर्घ काळ चेअरमन व सूत्रधार राहिले आहेत.१९९० व १९९२ च्या अयोध्या येथील कारसेवेत त्यांनी जिल्ह्याचे नैतृत्व केले होते. अतिशय धाडसी, परखड व धडाकेबाज असे हे नैतृत्व जिल्ह्याने अल्पसंख्याक नैतृत्व गमावले आहे.
त्यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यात विशेषतः भाजप पक्ष संघटना कार्यकर्त्यांमध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.