श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरातील नेवासा रोडवरील ओव्हरब्रीजजवळ खंडोबा मंदिरासमोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल, मोबाईल, मिरची पूड, नायलॉन दोरी, धारदार चाकू हत्यारे जप्त केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास नेवासा रोडवरील ओव्हर ब्रीजजवळ इंदिरानगर येथील खंडोबा मंदिरासमोर तिघे जण स्वतःचे अस्तित्व लपवून रस्ता लूट, अगर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमून होते. या दरम्यान गस्त घालत असलेल्या पोलिसांना या तिघांवर संशय आला. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी लागणारे लोखंडी पाईप, नायलॉन दोरी, मिरची पूड, एक धारदार चाकू, दोन लाकडी दांडे, 35 हजार रुपयाची एक निळ्या रंगाची मोटरासायकल क्र. एमएच 17 सीसी 1067 तसेच एक विना नंबरची लाल रंगाची मोटारसायकल असा एकूण 70,100 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय काळे यांनी फिर्याद दाखल केली असून त्यावरून गुन्हा रजिस्टर नं. 153/2021 प्रमाणे आरोपी सूरज पंडित शिपी (वय 21), सचिन अण्णासाहेब ढोबळे, (वय 28), सुनील सीताराम पडघलमल, (वय 20), तिघे रा. वेताळबाबा चौक, लोणी खुर्द, ता. राहाता यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 399, 402 अन्वये दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here