बेलापूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी धोकादायक असुन, ती पाडण्याची सूचना सन २०१५ ला करुनदेखील त्या काळातील पुढाऱ्यांनी तो अहवाल लपवुन ठेवला, असा आरोप करत, दुर्दैवाने काही अघटीत घडले, तर त्यास जबाबदार कोण?? असा सवालही सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केला आहे.

पाण्याच्या टाकी धोकादायक असल्याबाबतची माहीती देण्यासाठी सोमवारी (दि.२२) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.

टाकीची मुदत संपली; ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे पत्र…

येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ असणाऱ्या पाच लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीची मुदत संपल्याने ती उंच टाकी पाडण्याची कार्यवाही करावी. अन्यथा; भविष्यात उदभवणाऱ्या परिस्थितीस ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा उपविभागाने १० जुलै २०१५ रोजी दिले होते. मात्र, तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. ही टाकी अतिशय धोकादायक झाली असून, ती केंव्हा कोसळेल याचा नेम नाही. तसे झाल्यास गावाला पाणी पुरवठा होणार नाही. याला सर्वस्वी जबाबदार त्या काळचे पदाधिकरी राहतील,असा खुलासा सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केला आहे.

टाकी धोकादायक असल्याबाबत प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अहवाल…

यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाच लाख लिटरची पाणी साठवण व पाणी पुरवठा टाकी असून याच टाकीतून सध्या गावाला पाणी पुरवठा होत आहे. टाकीची मुदत संपल्याने व पडझड झाल्यामुळे तीचे प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यामार्फत स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यांनी १ जुलै २०१५ रोजी आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाला सादर केला होता. त्यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही टाकी तात्काळ पाडण्यात यावी, असे पत्र ग्रामपंचायतीला दिले होते. मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ही टाकी इतकी धोकादायक आहे की, ती जोराच्या वाऱ्याने सुद्धा कोसळू शकते. असा काही अनर्थ झाला तर गावाला पाणी पुरवठा करता येणार नाही. नवीन टाकी उभारण्यासाठी कोरोनामुळे तात्काळ निधी उपलब्ध होणार नाही.

दुर्घटना घडल्यास गावाच्या पाणी पुरवठ्याचे काय ?

२०२१-२२ या आर्थिक वर्षात १५ व्या वित्तआयोगातून १० लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी तरतूद केली जाईल.१५ व्या वित्त आयोगाच्या निधी मधून जास्तीस-जास्त निधी नवीन पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी द्यावा लागणार असल्याने गावातील इतर विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे. गावातील रस्ते, गटारी या कामासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील काळात 4 कोटी खर्चाची पाणीपुरवठा प्रस्तावित केल्याचे तत्कालीन सत्ताधरी मंडळी सांगतात. पण ह्या योजनेत वाड्या-वस्त्यांचा समावेश नव्हता. नवीन पाण्याची टाकी देखील प्रस्तावित केलेली नाही. टाकी बांधण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून निधी दिला जाईल. परंतु, टाकी बांधण्यास दिड वर्षाचा कालावधी लागु शकतो. या काळात काही घटना घडल्यास गावाच्या पाणी पुरवठ्याचे काय ? असा सवालही साळवी व खंडागळे यांनी केला आहे. मागील काळात पाणी साठवण तलावात साठलेला गाळ, शेवाळ आदी काढले नसल्याने खराब पाणी येत होते. त्याची कार्यवाही पण आम्ही सुरू केले आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेती महामंडळाकडून जागाही प्राप्त करून घेण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे साळवी व खंडागळे यांनी सांगितले. कै.भागवतराव खंडागळे सरपंच असताना ही पाण्याची टाकी बांधलेली होती. आता त्यांचा नातु अभिषेक खंडागळे उपसरपंच असताना त्याने नवीन दहा लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here