नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने लॉकडाऊनच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नेवासा कॉंग्रेसने कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक तसेच सर्वसामान्य जनतेसह तालुक्यात छोट्या -मोठ्या व्यवसायिकावर अन्याय करणारा असल्याचा आरोप केला आहे.सर्वसामान्य जनता तसेच छोट्या- मोठ्या व्यवसायिकांना विचारात न घेता जिल्हा प्रशासनाने परस्पर मनमानीपणाने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतल्याचे यात नमूद करून त्यास नेवासा काँग्रेसने कडकडून विरोध केला आहे. लॉकडाऊन काळात हातावर पोट अवलंबून असणाऱ्या श्रमिकांचा, छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, यात कुठलाही विचार प्रशासनाने केला नसल्याने याकडे ही लक्ष वेधण्यात आले आहे.श्रमिकासह व्यावसायिकावर या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, कौटुंबिक गरजा पूर्ण करणे त्यांना अशक्य बनल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य जनता तसेच व्यवसायिकांच्या हिताचा विचार न करता परस्पर जारी केलेला लॉकडाऊन चा आदेश त्वरित मागे घेण्याची विनंती नेवासा काँग्रेसच्यावतीने निवेदनात करण्यात आली असून, त्यावर गांभीर्याने त्वरित विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर नेवासा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संघटक संदीप मोटे, प्रसिद्धीप्रमुख सचिन बोरुडे, नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव, युवकचे कार्यअध्यक्ष आकाश धनवटे, गौरव कसावणे आदींच्या सह्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here