नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – सध्या सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नसतांना खाजगी बँकांकडून तसेच खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना ज्या खाजगी बँकांनी कर्ज दिलेले आहे त्यांच्याकडून लॉकडाउन असतांनाही संबंधित महिला बचत गटांच्या महिलांना कर्ज वसूलीसाठी तगादा केला जात आहे. संबंधित कर्जदारांना याचा मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत असून ही सावकारी वसुली त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी मराठा सूकाणु समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी नेवासा तहसीलला दिलेल्या निवेदनात केली आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, अनेक गोरगरीब कुटुंबातील लोक हे हॉटेल, कापड दुकान, किराणा दुकान, तसेच वेगवेगळ्या दुकानांमध्ये कामे करुन आपला उदरनिर्वाह करतात. परंतु सध्या लॉकडाउन परिस्थिती असल्यामुळे सदर ठिकाणी कामावर असलेले अनेक गोरगरीब सध्या घरी बसून आहेत. हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यातच कर्जपुरवठा करणाऱ्या अनेक बँकांकडून या सर्वसामान्य कर्जदारांकडे मार्च एंडच्या नावाखाली कर्जवसुलीसाठी सावकारी तगादा केला गेला. 

लोकांची उपासमार होत असतांना खाजगी बँकांकडून होत असलेल्या या कर्जवसुलीला आपल्या कार्यालयामर्फत बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  निवेदनावर गणेश झगरे यांसह महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले, सुभाष गागरे, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप, अंकुश डांभे, कैलास रिंधे, कल्पना शेटे, मनिषा फरताळे, मनिषा निमसे, संगिता झगरे, अमोल म्हस्के, रावसाहेब कावरे, बाळासाहेब आढाव, सागर सरोदे, अविनाश कणगरे आदींच्या सह्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here