श्रीरामपूर/प्रतिनिधी :- कुठलाही स्वार्थ न ठेवता कोविड बाधित रूग्णांना रूग्णालयात भरती करणे, प्लाझ्मादान, रक्तदान, अन्नदान, इंजेक्शनची उपलब्धता, अंत्यविधी आदी सुविधा पुरवत ‘श्रीरामपूर हेल्पींग हॅण्ड‘ टिमच्या माध्यमातून अवघ्या सात दिवसांमध्ये १५० हून अधिक रूग्णांना अक्षरशः जीवदान मिळाले. शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, व्यापारी व वकिली क्षेत्रातील तरूणांनी एकत्र येत हा आदर्श घालून दिला.

शहरात कोविड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच होत चालली आहे. सधन रूग्णांना पैशांच्या जोरावर सर्व सुविधा मिळतात. दुसरीकडे मात्र शहरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील रूग्णांना पैशाअभावी जीव गमवावा लागला. याची जाणीव झाल्याने मोरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकारातून अवघ्या आठवडाभरापुर्वी विविध क्षेत्रातील तरूणांची मोट बांधण्यात आली.

‘हे हात नव्हेत मदतीचे हे आहेत माणुसकीचे’ अशी टॅगलाईनसह माणुसकीचा वसा घेतलेल्या या टिममध्ये खोरे यांच्यासह कल्याण कुंकुलोळ, कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जीवन सुरूडे, शंभरहून अधिक वेळा रक्तदान करणारे मनोज ओझा, राहुल सोनवणे, फिरोज पिंजारी, फिरोज दस्तगिर, शुभम बिहाणी, केमिस्ट असोसिएशनचे सुजित राऊत, साजिद मिर्झा, सौरभ गदिया, कल्पेश चोरडिया, स्वप्नील सोनार, संजय वाघस्कर, ऋषीकेश बंड, निलेश गोराणे, नजीर पिंजारी व विकी जैन यांचा समावेश आहे.

सध्या २४ बाय ७ काम करणाऱ्या या टिमने आतापर्यंत सुमारे २५ रूग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. शासकीय यंत्रणेमार्फत सुमारे २०० रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरविले, १५० रूग्णांना शहर, तालुका, अहमदनगर व जिल्ह्याबाहेर औरंगाबाद, नाशिक व पुणे येथील रूग्णालयात संपर्क साधून खाटा उपलब्ध करून दिल्या. ५० हून अधिक रूग्णांना रूग्णांना रात्री अपरात्री तात्काळ रूग्वाहिका उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. वैयक्तीक खर्चातून अनेक रूग्णांना आषधांची मदत केली.

       कुंकूलोळ हे टिममध्ये अन्नदानाची जबाबदारी पार पाडतात. सध्या शहरातील ७० हून अधिक रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत दोन्ही वेळचे जेवन व पिण्याचे पाणी पोहोच करतात. या टिमच्या कार्याचे प्रेरणा घेत औरंगाबाद येथील प्रसाद पाटणी श्रीरामपूर तालुक्यातून औरंगाबाद येथे उपचार घेत असलेल्या १६ रूग्णांना तर अहमदनगर येथील रविंद्र नारंग हे तेथील १० रूग्णांना  दोन्ही वेळचे जेवन पुरवित आहेत. विशेष म्हणजे टिमच्या माध्यमातून आज अक्षय तृतियेचे गोड जेवन रूग्णांना देण्यात आले.

कोविड रूग्णांना दवाखान्यात, सिटी स्कॅन, रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी आपल्या वाहनातून नेण्यास कोणीही धजावत नाही. मात्र जीवन सुरूडे यांनी सलिम शेख हा रिक्षाचालकास प्रोत्साहित केले. शेख आता अत्यल्प दरात हे काम अहोरात्र करीत आहेत.

तीन अत्यंविधी

शहरातील लक्ष्मीनगरमधील एक वृद्ध महिला व एका दाम्पत्याच्या मृत्यूनंतर नातेवाईक व आसपासचे नागरिक अत्यंविध करण्यास धजावत नव्हते. केतन खोरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः पुढाकार घेत नजीर पिंजारी, निलेश गोराणे यांच्या मदतीने हे अंत्यविधी पार पाडले.

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष

या संकट काळात शहरातील काही रूग्णालयांकडू अडवणुकीची भुमिका घेतली जात आहे. अतिरिक्त बील आकारणी, सीटीस्कोर जास्त असलेले, सॅच्यूरेशन कमी असलेले तसेच परिस्थितीने गांजलेल्या रूग्णांना दाखल करून न घेणे. ऑक्सिजन, इंजेक्शनसाठी रूग्णांच्या नातेवाईकांना सांगणे अशा एकना अनेक अडचणींचा सामना काम करताना येतोय. मात्र केवळ सामाजिक बांधिलकीतून टिमचे सर्व सदस्य प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत रूग्णांसाठी झटत आहेत. -केतन खोरे, श्रीरामपूर हेल्पींग हॅण्ड टिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here