श्रीरामपूर : जि.प. सदस्या आशाताई दिघे व मंगलताई पवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून जिल्हा परिषदेने पंचेचाळीस रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यातून निमगाव खैरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली व जि.प.सदस्या आशाताई दिघे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जि.प. मा.सभापती बाबासाहेब दिघे, पं. समिती सदस्य विजय शिंदे, सरपंच शिवाजीराव शेजुळ, संतोष भागडे, सुरेश कालंगडे, गणेश भाकरे सोपानराव शेजुळ, चंदु शेठ वाघ, तुकाराम काजळे, प्रा. आरोग्य केंद्राचे डॉ. धापटे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी करण ससाणे म्हणाले, रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणी येत होत्या. दिघे ताई व पवार ताई यांच्या प्रयत्नाने रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार असून रुग्णांना मदत मिळणार आहे. दिघे उभयंतांनी व पवार ताई यांनी त्यांच्या गटात अनेक जनोपयोगी विकासाची कामे केलेली असून त्यांचे कार्य जिल्ह्यासाठी मार्गदर्शक आहे.
सचिन गुजर म्हणाले की जिल्हा परिषदेने अतिशय चांगला निर्णय केला असून त्यांच्या या निर्णयाला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्यातील सर्व मंत्री, सर्व आमदार, यांनी मदत केल्याने त्यांचे आभार मानले व जि. प. अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांना धन्यवाद दिले.
बाबासाहेब दिघे म्हणाले की स्व.जयंतराव ससाणे यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आम्ही सर्वजण विकास कामे करत असून गटातील जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवाजी शेजूळ व संतोष भागडे यांनी स्व. जयंतरावजी ससाने पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर दिघी फाट्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम केले. दिघी फाटा बारमाही केला. त्यामुळे गावात बागायती क्षेत्र वाढले. स्व. जयंतराव ससाणे यांच्या संकल्पनेतून व बाबासाहेब दिघे यांच्या मदतीने गावात अडीच किमी. ओढ्याचे शिरपूर पॅटर्नप्रमाणे खोलीकरण करण्यात आले. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगत बंधाऱ्याचेही खोलीकरण करण्यात आले, त्यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. याप्रसंगी पं. समिती सदस्य विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. धापटे यांनी आभार मानले.