श्रीरामपुर/प्रतिनिधी :- येथील ग्रामीण रुग्णालयास(श्रेणी वर्धीत) उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी मिळाली असून यासाठी नव्याने 20 पदांची भरती करण्यात येणार आहे.

उपजिल्हा रुग्णालययासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. अविनाश आदिकांच्या पत्राची दखल घेत आरोग्य मंत्री टोपे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन होऊन 20 पद मंजुरी दिली आहे. तसा शासन निर्णय क्र. 20 20 /प्र.क्र. 44 आरोग्य/ 3 नुसार 7 जून रोजी पारित करण्यात आला आहे.

श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन होऊन पदे भरणे करिता मंजुरी द्यावी अशी मागणी आदिक यांनी केली होती. या बरोबरच ग्रामीण रुग्णालयात शेजारील तलावातून व कॅनॉलमधून पाणी झिरपून परिसरात दलदल होते. त्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीस धोका निर्माण होऊ शकतो, परिसरात पेवर ब्लॉक बसून कॉंक्रिटीकरण तसेच आता उप-जिल्हा रुग्णालय झाल्यास त्यासाठी इमारतीचे विस्तारीकरण करण्यात यावे, विद्युत जनित्र खरेदीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी करून आदिक यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने उत्तर नगर जिल्ह्यात पहिलेच उप जिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे.

या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने स्वतंत्र रक्तपेढी, बाल रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, सहाय्यक आधी सेविका, परी सेविका, औषध निर्माण अधिकारी अशी विविध 20 पदे ही आरोग्यमंत्र्यांनी मंजूर केली आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here