श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोना काळ जसा सर्वसामान्यांसाठी क्लेशदायक व वेदनादायी होता तसा तो जिल्हाभरातील कलाकार व लोक कलावंतांसाठीही होता. याची दखल घेत शहरातील कला प्रेमींनी २०८ किराणा किट कलाकार व लोककलावंतांना वाटप करत आपल्यातील मानवतावाद जिवंत असल्याचे उदाहरण समाजाला घालून दिले.

कोरोना काळात अनेक लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. याची जाणीव मितेश ताके, नवनाथ कर्डीले, विनोद वाघमारे आणि टीमला होती. या टीमने समाजातील अनेक दानशूरांना आव्हान केले. त्याचबरोबर मितेश ताके यांनी शॉर्टफिल्म मेकिंगची कार्यशाळा आयोजित करून त्या माध्यमातूनही ४२,३०० रुपये निधी जमविला. या कार्यशाळेत जवळपास ६० जणांनी सहभाग नोंदविला. उभ्या राहिलेल्या देणगीतून पहिल्या फेरीत ३२, दुसऱ्या फेरीत ७०, तिसऱ्या फेरीत ५५, चौथ्या फेरीत ५१ अशा एकूण २०८ कुटुंबांपर्यंत शिधा पोहचविला. या किटमध्ये गहू – ५ किलो, तांदूळ – २ किलो, साखर -१ किलो, चहा पावडर – पावशेर, तेल – १ पिशवी, शेंगदाणे – अर्धा किलो, तूर डाळ – पावशेर, पोहे – १ किलो, लाल मिरची पावडर – ३ नग (१० रु ) , हळद – २ नग (१० रु ), प्रवीण मसाले – ३ नग (१० रु ), अंगाचा साबण – २ नग (१० रु ), कपड्याचा साबण – २ नग (१० रु ) आदी वस्तू होत्या.

किट वाटप केलेल्या लाभार्थींमध्ये नर्तक, नर्तिका, गायक, गायिका, वादक, अभिनेते, अभिनेत्री, पोतराज, डफ वादक, वाघ्या – मुरळी, आर्केस्टा कलावंत, पोतराज, लावणी नृत्यांगना, तमाशा कलावंत, बँड पथक, दवंडी देणारे डफ वादक, रायरन (बहुरूपी), नंदीवाले असे कलाकार तर होतेच पण एक अंध निराधार आजी, बदली ड्रायव्हर, इस्त्री करणारे, फोटोग्राफर, सलून चालक, टेम्पो रिक्षा चालक, औद्योगिक कामगार, घरकाम करणाऱ्या मावशी, मंडप व्यावसायिक, निराधार वयोवृद्ध असेही घटक होते . तसेच तीन मतिमंद प्रौढ अपत्ये असलेल्या एक आजीही होत्या त्यांना आवर्जून दोन किट्स दिल्या.

हे वाटप करताना लाभार्थ्यांचा आत्मसन्मान राखला जाईल याची काळजी या टीमने घेतली, किराणा वाटप करताना त्यांचे फोटो घेतले नाहीत. तसेच कुठल्याही लाभार्थ्यांचे नाव प्रसिद्ध केले नाही. शेवटच्या फेरीत किराणा सामानाबरोबर देणगी म्हणून मिळालेले १०० मास्कचे देखील वाटप करण्यात आले. या कामासाठी भारतभरातून देणगी आलीच पण अमेरिका, आस्ट्रेलिया व जपान येथून देखील मूळ श्रीरामपूरकर असलेल्यांकडून देणगी आली.

[URIS id=1702]

मित्रांनो, आपल्या घासातील एक घास या कलावंताना दिलात, आपले खूप खूप आभार ! आता लॉकडाऊन उघडले आहे. त्यामुळे आपण हा उपक्रम थांबवत असून कुणीही आता देणगी पाठवू नये, अशी विनंती मितेश ताके यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here