श्रीरामपूर(प्रतिनिधी)- पावसाचे पाणी पूर्णवादनगर चराच्या पलीकडील नागरी वसाहतीत जाऊ नये म्हणून रोड क्रॉसिंगसाठी मोठे पाईप टाकावे अन्यथा पूल बांधावे ही मागणी गेल्या चार वर्षांपासून आपण करत असून त्याकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका नगरपालिकेच्या नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.

रेल्वे रुळाच्या अलीकडील शहराचे सांडपाणी, पावसाचे पाणी पूर्णवादनगर चरातून वाहून शहराबाहेर जाते या चरावर रोड क्रॉसिंगसाठी उत्सव मंगल कार्यालय परिसर, शांताई व निलकंठ अपार्टमेंट, पूर्णवादनगर, महाले-पोदार स्कुल परिसरात छोटे पाईप टाकण्यात आले असल्याने हे पाणी ओव्हर फ्लो होऊन नागरी वसाहतीत शिरते. प्रत्येक वर्षी भरपावसात मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, नगरपालिका आरोग्य विभाग कर्मचारी व आपण स्वतः नागरिकांच्या घरात जाणारे पाणी अडविण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या ४ वर्षांपासून रोड क्रॉसिंगच्या ठिकाणी पूल बांधावे अथवा मोठे पाईप टाकावे ही मागणी आपण करत आहोत मात्र पालिका प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नागरी वसाहतीला वेठीस धरण्याचा घाणेरडा प्रकार नगरपालिकेतील काही मंडळी करत असल्याचा आरोप नगरसेविका स्नेहल खोरे यांनी केला.

ही समस्या कायमची सोडविण्यासाठी नागरी वसाहतीत प्राधान्याने काम करणे गरजेचे असताना सत्ताधारी नेत्याच्या कार्यकर्त्याच्या रिकाम्या बिल्डिंगजवळ २ लाख रुपयांचे नाला अंडर ग्राउंड करण्याचे काम नगरपालिकेच्या तिजोरीतून झाले. ज्या ठिकाणी एकही नागरिक राहत नाही त्या परिसरात रस्ते करणे, नाला अंडर ग्राउंड करणे करदात्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत बघणारे आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पूर्णवादनगर परिसरातील नागरिकांची ही समस्या न सोडवल्यास नागरिकांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल असा इशारा नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here