अहमदनगर/प्रतिनिधी :- आज महापालिकेच्या महापौर- उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील एका हाॅटेलमध्ये चांगलाच राडा झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे निलेश भाकरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मला शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्याने शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर होणार आहे. तशी अधिकृत घोषणा बाकी आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मंगळवारी रात्री एका हाॅटेलमध्ये जमले होते. त्याठिकाणी दोन पदाधिकाऱ्यांत सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून पुढे मोठा राडा झाल्याची चर्चा आहे.

हा वाद नंतर थेट कोतवाली पोलीस ठाण्यात गेला असून भाकरे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मला शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे. एकीकडे महापौर पद पदरात पडल्याचा आनंद असतांना दुसरीकडे मात्र शिवसेनेत राडा झाल्याने आगामी काळात मोठा संघर्ष महापालिकेत पहावयास मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here