अहमदनगर/प्रतिनिधी :- सावेडीतील तोफखाना लसीकरण केंद्रावर शुक्रवारी हाणामारी झाल्याची घटना घडली. भाजपाच्या पदाधिकार्‍याला  लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी धक्काबुक्की केली. दरम्यान, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी कोणी आले नव्हते. लसीकरण केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी गेले. लसीकरणासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

मनपाच्या तोफखाना लसीकरण केंद्रावर  शुक्रवारी कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध होते. एका खासगी कंपनीतील कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांना लसीकरण केंद्रावर घेवून आले होते. लसीकरणात वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न करणार्‍या पदाधिकार्‍याला नागरिकांनी जाब विचारत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

लसीकरण केंद्रावर हाणामारी झाल्याची माहिती समजल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, उपनिरीक्षक सूरज मुंढे यांनी केंद्राला भेट दिली. लसीकरण केंद्रावर कोणतीही हाणामारी झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते लस घेण्यासाठी तेथे आल्यानंतर त्याठिकाणी गर्दी झाली होती व त्यानंतर गोंधळ झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लसीकरण केंद्रावर पुन्हा अशी घटना घडु नये म्हणून त्याठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here