संगमनेर/प्रतिनिधी :- तालुक्‍यातील डोळासने येथील एका व्यक्तीच्या शेतीचे निर्वनीकरण करण्याचा रिपोर्ट तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी संगमनेरचे फॉरेस्ट अधिकारी विशाल बोऱ्हाडे याने संबंधित शेतकऱ्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. यात तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्‍कम स्विकारताना बोऱ्हाडे यास नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पडकडले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. रात्रीच्या वेळी देखील नगरच्या विभागाने ही कारवाई करण्यासाठी फार मोठा पाठपुरावा केल्याने त्यांचे वरिष्ठांकडून अभिनंदन होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्‍यातील डोळासने येथील एका शेतकऱ्याला त्यांची शेतीचे डी.फॉरेस्ट म्हणजे निर्वनिकरण आहे असा रिपोर्ट हवा होता. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कायदेशीर दृष्ट्या विशाल बोऱ्हाडे यास तक्रारदाराची जमीन निर्वनिकरण आहे असा रिपोर्ट पाठविण्यास सांगितला होता. त्यानंतर तक्रारदार हा तेव्हा फॉरेस्ट अधिकारी बोऱ्हाडे याच्याकडे गेला, तेव्हा अधिकाऱ्यांने त्याचे लाचखोर चाळे सुरू केले. आज उद्या म्हणत तो त्याच्या मुळ मुद्यावर आला. विशाल बोऱ्हाडे हा डायरेक्ट ACF, लवकरच DCF आणि मग किमान 15 ते 18 वर्षे IFS राहिला असता, DCF म्हणून अगदी लवकरच प्रोमोट होणार होता.

दरम्यान, तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना विनंती सोडून कोणतीही लालच दाखविली नाही. मात्र, बोऱ्हाडे हा त्याच्याकडून पैसे उकळविण्याच्या विचारावर ठाम होता. त्यामुळे, वारंवार येऊन देखील काम का होत नाही? असे म्हटले असता बोऱ्हाडे याने तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. जर ही रक्‍कम मिळाली नाही तर काम होणार नाही. मात्र, तक्रारदाराने त्यास विनंती केली की, साहेब.! माझ्याकडे इतके पैसे नाही, जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला माझी जमीन निर्वनिकरण आहे असा रिपोर्ट पाठविण्यास सांगितले आहे. मात्र, बोऱ्हाडे याने तक्रारदाराकडे सौदेबाजी सुरू केली. हो नाही करता-करता अखेर 1 लाखांची रक्‍कम 40 हजार रुपयांवर येऊन पोहचली.

दरम्यान, बोऱ्हाडेची मानसिकता लक्षात घेता आणि त्याच्या रकमेचा आकडा लक्षात घेता तो सामान्य व्यक्तीला देणे अशक्य आहे. वारंवार विनंती करुन देखील अखेर तक्रारदाराने अंतीम पाऊल उचलले. विशाल बोऱ्हाडे याला जेलची हवा खायला घालायची या उद्देशाने तो 40 हजार रुपये देण्यास कबुल झाला. मात्र, हा सर्व घडलेला प्रकार त्यांनी नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर यांना माहिती दिली. त्यानंतर खेडकर यांचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले. त्यानंतर इथे-तिथे करता करता ही 40 हजार रुपयांची रक्‍कम विशाल बोऱ्हाडे याने पुणे तालुक्‍यातील आळेफाटा येथे स्विकारली. तेथेच त्यास लाचलुचपतच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई नाशिक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे पोलीस कर्मचारी विजय गांगूल, रविंद्र निमशे, हरुण शेख अशा टिमने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here