श्रीरामपूर- छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्री शिवाजी चौकातच व्हावा या मागणीसाठी आम्ही  नगरपालीकेत मुख्याधिकाऱ्यांना घेरावो घालण्याचे व श्रीरामपूर बंदचे आंदोलन केले होते. या आंदोलनांवरुन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिकांनी माझ्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा स्वतंत्र भारतातील घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न आहे. श्रीरामपूरच्या राजकिय क्षेत्रात मोगलाई माजली असून हा अनुनयाचा आदिक पॅटर्न आहे. असल्या हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्रीशिवाजी चौकातच झाला पाहिजे यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची माझी तयारी आहे . पण श्रीशिवाजी चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचे शिवप्रेमींचे स्वप्न आम्ही पुर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीचे प्रकाश चित्ते यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्री शिवाजी चौकातच झाला पाहिजे, या मागणीसाठी शिवप्रेमींनी गेल्या ३० वर्षात अनेक आंदोलने केली. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी व आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातच बसवू अशी स्पष्ट व रोखठोक भुमिका जाहिर न केल्याने हे सत्ताधारी श्रीशिवाजी चौक सोडून दुसरीकडेच; इतर ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवणार आहेत या शंकेने शिवप्रेमींच्या मनात गेली अनेक वर्ष घर केलेले आहे. त्यामुळेच श्रीशिवाजी चौकातील पुतळ्याच्या मागणीला चळवळीचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावनांशी खेळणे हे आगीशी खेळण्यासारखे आहे हे आदिकांनी समजून घ्यावे. शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याचे परिणाम आदिकांना भोगावे लागतील.

नगराध्यक्षा आदिकांचे छत्रपतींच्या श्रीशिवाजी चौकातील पुतळ्याच्या विषयात “खायचे दात वेगळे असून दाखवायचे दात वेगळे आहे” त्यांची न्यायालयात वेगळी भूमिका आहे आणि प्रत्यक्षात वेगळीच भूमिका आहे. नगराध्यक्षांच्या या दुटप्पी भुमिकेच्या विरोधात आंदोलन केले तर ते त्यांना सहन होत नाही. त्यांच्यातला हुकुमशहा जागा होतो. छत्रपतींच्या पुतळ्याच्या विषयातच नाही; तर नगरपालीकेच्या इतर कुठल्याही विषयात (नागरी समस्या, भ्रष्टाचार आदींसारख्या दुसऱ्याने कुणीही त्यांच्यावर व त्यांच्या कारभारावर आरोपच करु नये, संपुर्ण श्रीरामपूर तालुक्यातल्या राजकिय पर्यावरणात भितीचा आणि धमकीचा संदेश जावा म्हणून आदिकांनी माझ्यावर ५ कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. छत्रपतींचा पुतळा श्रीशिवाजी चौकात बसवायचा नाही, त्याविरोधात आंदोलन होवू द्यायचे नाही, त्यांचे विरोधात बोलायचे सुद्धा नाही, अशी मुस्कटदाबीची नगराध्यक्षांची भुमिका आहे. यापूर्वीही श्रीरामपूरच्या राजकारणात दिग्गज सत्ताधीश होवून गेले, तरी त्यांच्या काळात असली दादागिरी चालली नाही. त्यामुळे असल्याप्रकारची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

यावेळी नगरसेवक किरण लुनिया, मनसेचे बाबा शिंदे, अरुण पाटील, प्रविण पैठणकर, प्रविण फरगडे, सरपंच महेंद्र साळवी, डॉ शिरसाठ, सुदर्शन शितोळे, मनोज हिवराळे, ऍड परदेशी, संजय पांडे, अभीजीत कुलकर्णी,अर्जुन कर्पे, सोमनाथ कदम, गणेश भिसे, संदीप वाघमारे, बाळासाहेब हिवराळे, विकी देशमुख, संदीप पवार, महेश विश्वकर्मा, सोमनाथ पतंगे, संजय यादव, किशोर रोकडे, मंगेश शेळके, पप्पू कडूस्कर आदी सह पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here