माळवाडगाव/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुका गोदावरी हद्द पट्ट्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली दाबून वैजापूर तालुक्यात बाजाठान येथील ज्ञानेश्वर रामू दळे (वय ३८) हा तरुण कामगार जागेवरच ठार झाला. आज (दि.७) रोजी पहाटे ४ वाजता ही घटना घडली.
जेसीबीच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा सुरू आहे. भोसले नावाच्या वाळू तस्करांच्या शेतात भला मोठा साठा आहे. त्याच्याकडेच मयत तरुण कामावर होता.
ज्ञानेश्वर दळे यांच्याशी घटने अगोदर अर्धा तास वडीलांनी एवढा उशीर का झाला म्हणून मोबाईल वर संपर्क केला होता. अन तासाभरात श्रीरामपुरला साखर कामगार रूग्णालयात दाखल केल्याचा निरोप आला. पाऊस येणार म्हणून वाळू तस्कर सुसाट वाळू वाहतूक करत होते. ज्ञानेश्वरला घरी जाण्यास मज्जाव करत असावे या वादातून आम्हाला घातपात झाल्याचा संशय येत असल्याची तक्रार वडील रामू दळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.