नेवासा/प्रतिनिधी(सचिन कुरूद) :- “’आई’ म्हणजे देवाचं दुसरे रूप. असे म्हणतात की देव स्वत: या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. “स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी” असे म्हटले जाते. आईची माया अगाध आहे.

परंतु नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्‍यात चक्क आईनेच आपल्या काळाजाच्या तुकड्याची दगडाने ठेसून हत्या केल्याची अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. १० वर्षीय मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आले. वरखेड येथे ही घटना घडली.

नेवासा तालुक्यातील वरखेड येथे एका दहा वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून खून करण्यात आली. मंगळवारी (ता. ६) रोजी रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती समजताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोहम खिलारी (वय १०, राहणार बुलढाणा, हल्ली वरखेड, ता. नेवासे) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. मयत मुलगा हा गेल्या आठ-नऊ वर्षांपासून आपल्या दोन भाऊ व आईसह सावत्र वडिलांसमवेत वरखेड येथे वास्तव्यास होता. दरम्यान त्याचा मृतदेह आज पहाटे रामडोह रस्त्यालगतच्या पाटचारी परिसरातील रस्त्याचे कडेला छिन्नविच्छिन्न अवस्थेत परिसरातील लोकांना दिसला.

या घटनेची माहिती लोकांनी नेवासे पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनस्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मयत बारकूचा आई व सावत्र वडील समाधान यांच्याकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा वरखेड गावात आहे. त्याचा स्वभाव खूपच गरीब होता. तो नेहमी भीतीच्या सावटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात. त्यामुळे त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यासारखे बाहेरचे कोणीही असण्याची शक्यताच नाही. याप्रकरणी नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

यात पोलिसासह ग्रामस्थांना देखील या हत्येबाबत त्याच्या सावत्र बापावर संशय होता. मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच खरा खुनी शोधला. त्याची आई सीमा उत्तम खिलारे हिनेच त्याचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची बाब समोर आली आहे. घटनेनंतर सोहमचा मृतदेह पाहून टाहो फोडणाऱ्या त्याची आई सीमा हीने तपास दरम्यान पोलिसांची चांगलीच दिशाभूल केली. यावेळी तिने अनेकांवर संशय घेतल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र मिनिटा-मिनिटाला ती पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला आणि तिनेच
योजलेल्या योजनेत तीच अडकली. सोहमची हत्या त्याची आई सीमा उत्तम खिलारे हिनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले असता तिला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

या हत्याप्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here