अहमदनगर :- नगर अर्बन बँकेच्या 22 कोटी 90 लाख रूपये कर्ज फसवणूक प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने डॉ. नीलेश शेळकेसह डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे यांना अटक केली आहे.
न्यायालयाने शेळकेला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. तर तीन डॉक्टरांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार डॉ. नीलेश शेळके, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, स्पंदन हेल्थकेअरचे जगदीश कदम यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
नगर अर्बन बँकेतून डॉ.शेळके, डॉ. सिनारे, डॉ. श्रीखंडे यांच्या नावावर प्रत्येकी 5 कोटी व डॉ. कवडे याच्या नावावर 7 कोटी 90 लाखांचे कर्ज घेण्यात आले होते. मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेण्यात आले. मात्र, या रकमेतून मशिनरी खरेदी न करता कर्जाची रक्कम इतरत्र वापरल्याने बँकेची फसवणूक झाल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता.