श्रीरामपूर/प्रतिनिधी :-  पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराच्या परिणामी, ऑनलाईन सर्वसाधारण सभेत तांत्रिक त्रुटींमुळे, शहराच्या विकासावर चर्चा न होता, सत्ताधारी हे परस्पर ठराव मंजूर करून, लोकशाहीचा खून करीत आहेत. तसेच विविध कामांच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा वाढीव बिले काढत असल्याने, पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभे ऐवजी, ऑफ लाईन सभा घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष करण ससाणे व त्यांच्या नगरसेवकांनी केली होती, मात्र पालिकेच्या सत्ताधा-यांनी, आपल्या राजकीय अधिकाराचा वापर करून, १२ जुलै २०२१ रोजीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेतल्याने, काँग्रेस नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार घालत, ऑनलाईन सभे दरम्यान मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन दिले.

सदर निवेदनात श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मार्च महिन्यात झालेल्या ऑनलाईन सभेमध्ये, ऑनलाईन सभेच्या आड लपून बोगस बिले करुन, बरीच कामे न करता त्यांची पैसे काढण्याचे निर्णय झाले. तसेच संजयनगर व ईदगाह परिसर येथील परिसराला तेथील नागरिकांना अंधारात ठेवून परस्पर गोविंदनगर नामकरण करण्यात आले. तसेच सबंध शहराच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा संदर्भातील विषय हा विशेष सभेत न घेता याच ऑनलाईन मिटींगमध्ये उतरकण्याचा जो घाट घातला याचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. वरील सर्व विषयासंदर्भात पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा शिवाजी चौकात बसवावा. या संदर्भात २२ नगरसेवकांनी विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली असतांना सुद्धा, सदर विषयाला बगल देण्यासाठी सर्वसाधारण सभेत हा विषय घुसवण्यात आला. तसेच भिमाशंकर परदेशी, इशान हुसेन पठाण, धीरज शांतीलाल गुजर या ठेकेदारांच्या नावाने किरकोळ कामाच्या नावाखाली १८ लाख २३ हजार २२० रुपयांची बोगस बिले काढण्यात आली. त्यात अनेक कामे परत वेगवेगळ्या नावाने दाखविण्यात आली. अनेक कामे प्रभागाचे नाव न सांगता मोघम पद्धतीने दाखवून बोगस बिले काढण्यात आली. महिन्याला २३ लाख रुपये घनकचरा ठेका गेलेला असतांना नगरपालिकेने ओम मशिनरी अॅण्ड इलेक्ट्रीकल या हार्डवेअर दुकानातून २३ हजार ४४० रुपयांची झाडू खरेदी केली, सॅनिटायझर ड्रम १८०० रुपयाना खरेदी केले. सुधीर संतोष जाधव या ठेकेदाराच्या नावाने रंग काम करणे या नावाखाली ४ लाख ४५ हजार ६२४ रुपयांची बोगस बिले काढण्यात आली. फ्लेक्स बोर्डचा वार्षिक छपाईचा रेट ३१ रुपये प्रति स्क्वेअर फुट एवढा दाखविण्यात आला. तसेच आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देतांना घनकचरा ठेक्यावरील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. आणि महत्वाचे म्हणजे कोणत्याही नागरिकांची मागणी नसतांना संजयनगर, ईदगाह परिसर, मिल्लतनगर, रामनगर, गोपीनाथनगर या परिसराला केवळ सभेच्या दिवशी एका नगरसेवकाने मागणी केली की गोविंदनगर नाव द्या आणि त्याच नगरसेवकांनी या विषयाला अनुमोदन दिले व संबंधीत भागाचे नामकरण करण्यात आले. आज सर्वांना अंधारात ठेवून व ऑनलाईन सभेच्या आड लपून अत्यंत फसव्या पद्धतीने ठराव करण्यात आला. त्यामुळे सदर भागातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. म्हणूनच काँग्रेस पक्षाच्यावतीने सतत मागणी करण्यात येत होती की, ऑफलाईन पद्धतीने ही सर्वसाधारण सभा घ्यावी, की जेणेकरुन सर्व विषयावर स्पष्टपणे चर्चा होईल. परंतु ऑनलाईन मिटींगच्या आड लपून आर्थिक गैरव्यवहार करणे, बोगस बिले काढणे व मनमानी कारभार करुन नागरिकांची फसवणूक करायची असल्याने, नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक ऑनलाईन मिटींगचे आयोजन केले आणि या चुकीच्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वरील तीनही विषयांना विरोध दर्शवणारे पत्र देऊन सभात्याग केला. भविष्यात या सर्व बोगस बिलांच्या चौकशीची उच्चस्तरीय मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचेही काँग्रेस नगरसेवकांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मनोर लबडे, नगरसेविका भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, मीराताई रोटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here