श्रीरामपूर (प्रतिनिधी) / – श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनीत नगरच्या गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने कट्टा बाळगल्याप्रकरणी एकास अटक करत नाही तोच 12 तासाच्या आत काल संध्याकाळी शहरातील वार्ड नंबर दोनमधील एका जणाकडे कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले. सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 भागातील नवी दिल्ली परिसरामध्ये असणार्‍या जैनब मस्जिद जवळ एका जणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नवरडे, सुनील दिघे, महेंद्र पवार, पंकज गोसावी या पोलीस पथकाने कसापळा रचून सर्फराज बाबा शेख उर्फ सर्फ्या राहणार (वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) याला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुससह पोलिसांनी पकडले. या कट्टयाची किंमत सुमारे 30 हजार रुपये इतकी आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 464/2021 प्रमाणे सर्फराज बाबा शेख उर्फ सर्फ्या याचेविरुध्द भारतीय हत्यार कायदा प्रमाणे आर्म अ‍ॅक्ट भादंवी कलम 3, 5/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात या दोन दिवसात 3 कट्टे पकडले जाणार असल्याने एक मोठे रॅकेटच उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here