सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थिती होणार हा सोहळा यावर्षी कोरोना संकटामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थिती पार पडला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणेही यावेळी उपस्थित होते. यावर्षी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मिळाला होता. महापुजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलालाच्या चरणी साकडे घातले आहे.
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वर्ध्याच्या कोलते दांपत्याला मिळाला महापूजेचा मान.
▪️वर्ध्याच्या कोलते दांपत्याला मिळाला महापूजेचा मान.
सतत विठ्ठलाच्या सेवेत भक्तिमय होऊन वर्ध्यातील विठ्ठल मंदिरात वीणा वाजवण्याचे काम करणाऱ्या आणि गेल्या 49 वर्षांपासून पंढरीची वारी करणाऱ्या केशव कोलते यांना पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. कोलते (७१) हे नियमितपणे विठ्ठलनामात तल्लीन होत शहरातील विठ्ठल मंदिरात 20 वर्षांपासून वीणा वाजवतात.
पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची षोडशोपचार पूजा केली.