राहुरी/प्रतिनिधी (संदिप पाळंदे) :- तालुक्यातील गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रात पिसाळलेली कुत्रे चावल्यानंतर घ्यावी लागणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची चांगलीच धावपळ उडाली. ऐन आषाढी एकादशीला रुग्णांना लस घेण्यासाठी ‘सिव्हिल’ हॉस्पिटलची वारी करावी लागल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावा लागला. याविषयी माहिती घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. गणेश आडभाई यांच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही.
गुहा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून सात ते आठ ग्रामस्थांना चावा घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याने चावा घेण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली. गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर येथे ‘रेबीज’ लस उपलब्ध नसल्याचे समजले. तसेच ही लस तालुक्यात कुठेच उपलब्ध नसून त्यासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागेल. तेथेही लस उपलब्ध नसल्यास पुण्यातील ‘ससून’ला जावे लागेल अशी माहिती स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दिली. रुग्णांनी कपाळावर हात मारत ‘सिव्हिल’ हॉस्पिटलचा रस्ता धरला. ‘सिव्हिल’ हॉस्पिटलमध्ये लस घेऊन ‘रुग्णांनी’ सुटकेचा निश्वास सोडला. ऐन एकादशीच्या दिवशी ‘सिव्हिल’ रुग्णालयाची वारी करावी लागल्याने मात्र रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
“पिसाळलेल्या कुत्र्याचा गावातील तरुणांच्या मदतीने बंदोबस्त केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. ‘रेबीज’ लसीच्या बाबतीत आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधून लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.” – रामा बर्डे (उपसरपंच, गुहा)